2023 मध्ये शाहरुख-सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र; चाहत्यांना दिली खुशखबर ….
![Shah Rukh-Salman together on the big screen in 2023; Good news for fans ....](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Shah_Rukh_and_Salman_1640587743230_1640587765859.jpg)
2023 मध्ये शाहरुख-सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र;लवकरच सिनेमाची घोषणा…
सलमानआणि शाहरुख या दोन खान्सनी स्वतःची अशी एक स्वतंत्र जागा बॉलीवूडमध्ये निर्माण केली आहे. शाहरुखला बॉलीवूडचा ‘किंग खान’ तर सलमानला ‘बॉलीवूडचा भाई’ म्हणून ओळखलं जातं. बॉक्सऑफिसवर दोघांचे सिनेमे धडकले की धमाका झालाच समजायचा. आता हे झालं यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी पण पर्सनल लाइफमध्येही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आर्यन खानला अटक झालेली असताना सलमान खान ही पहिली व्यकती होती ज्यानं मित्र म्हणून शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. आता सगळं या दोन मित्रांमध्ये आलबेलं झालं असलं तरी मध्ये काही अशी वर्षही गेली जेव्हा या दोघांमधनं विस्तव जात नव्हता. आणि याचं कारण होतं ऐश्वर्या राय-बच्चन. असो तो एक मोठा वादाचा मुद्दा आहे. पण आपण पुन्हा कशाला दोघांमधले रुसवे-फुगवे बाहेर काढायचे. चांगलं ते पाहूया की.
सलमान आणि शाहरुखचा ‘करण-अर्जुन’ सिनेमा कोणाला आठवणार नाही? त्यावेळी केवळ सिनेमा सुपरहीट ठरला नव्हता तर सलमान-शाहरुखची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही लोकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. प्रत्यक्ष आयुष्यात सलमान शाहरुखपेक्षा थोडा लहान असला तरी त्या सिनेमात त्यानं शाहरुखच्या मोठ्या भावाची म्हणजे करणची भूमिका केली होती. तर शाहरुखनं अर्जुन या लहान भावाची व्यक्तीरेखा साकारली होती. काही दिवसांपूर्वी बातमी होती की करण-अर्जुनचा रीमेक किंवा सीक्वेल आणायचा निर्मात्यांचा विचार आहे. पण अजुनतरी तो विचार विचाराधीनच राहिलाय. असो,पण आता सलमाननंच त्याच्या वाढदिवशी त्या दोघांच्या चाहत्यांना खुशखबर दिलीय.