ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनाने निधन!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Sharavan-Rathod.jpg)
मुंबई – संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनानं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
66 वर्षीय संगीतकार असलेल्या श्रवण राठोड यांना माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. 1990 च्या दशकात नदीम-श्रवण यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. आशिकी, साजन, परदेस ते राजा हिंदुस्थानीपर्यंत या दोघांनी अनेक विशेष अल्बमसाठी गाणी गायली.
संगीतकार नदीम सैफी यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय. माझे शानू आता राहिले नाहीत. आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र घालवले. आम्ही अनेक यशोशिखरंही पाहिली. आम्ही एकमेकांकडे बघूनच मोठे झालो. आमचा संपर्क कधीच तुटला नाही, अशा भावनाही नदीम सैफी यांनी व्यक्त केल्या आहेत.
श्रवण राठोड यांनी एकेकाळी नदीम सैफींबरोबर अनेक गाणी गायलीत. या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिले. नदीम श्रवण या दोघांनीही संगीत क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.