घरातील दुःख बाजूला ठेवून बाहेर मोकळे पणाने काम केल्यास माणूस आनंदी, उत्साही राहतो – ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी
बालगंधर्व रंगमंदिराचा 56 वा वर्धापनदिन; ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
![Sad, sideways, open, work, human, happy, enthusiastic, senior, actress, Usha, Nadkarni, Balgandharva, Rangamandira, 56 anniversaries, lifetime achievements, awards,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/usha--780x470.jpg)
पुणे : मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. मी चांगल्या अन सोज्वळ भुमिका पण केल्या आहेत.तुमच्या प्रमाणे मला देखील दुःख आहे.प्रत्येकालाच दुःख असतं पण माणसाने आपले दुःख घरात ठेवावे अन् बाहेर मोकळे पणाने काम करावे. तरच तुम्ही आनंदी, उत्साही आणि चिरतरूण राहू शकता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.
निमित्त होतं बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर,प्रिया बेर्डे आणि सुरेखा कुडची,आयुक्त सूरज मांढरे, सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे डॉ. संजय चोरडिया,अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे, तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे, सोनू म्युझिकचे सोनू चव्हाण, सांस्कृतिक केंद्र विभाग ,पुणे मनपाचे अधिकारी राजेश कामठे, जेष्ठ गायक इकबाल दरबार, सुप्रिया हेंद्रे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच नाट्य क्षेत्रातील योगदानांसाठी सुचेता आवचट (संगीत नाटक), राजन मोहाडीकर (लेखन), अमोल जाधव (बालनाट्य), आनंद जोशी (दिग्दर्शन), सोमनाथ शेलार (अभिनेता नाटक विभाग),गौरी रत्नपारखी (युवा लेखक) तर पत्रकारितेतील पुरस्कार अजय कांबळे (डिजिटल मीडिया), चंद्रकांत फुंदे (इलेक्ट्रॉनिक मीडिया), सुवर्णा चव्हाण (प्रिंट मीडिया) यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रसेन भवार यांनी केले तर आभार पराग चौधरी यांनी मानले