राज कुंद्रा पोर्नोग्राफीचा सूत्रधार! पुरवणी आरोपपत्रात ठपका
![Raj Kundra is the facilitator of pornography! Reprimand in supplementary chargesheet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/RajKundra.jpg)
मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच यात मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात १,४६४ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात हा ठपका ठेवला आहे. यामुळे राज कुंद्रा आणखी अडचणीत आला आहे.
मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने पोर्नोग्राफी तयार करणाऱ्या टोळीचा फेब्रुवारीमध्ये पर्दाफाश केला होता. त्यात १ एप्रिल रोजी ९ जणांविरोधात ३ हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. नंतर राज कुंद्राच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्राचे अनेक प्रताप बाहेर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्न फिल्म रॅकेटचा मुख्य सूत्रधार राज कुंद्रा असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत आढळले. नंतर या प्रकरणात कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थोर्प यांना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांनी संगनमताने सिने क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अश्लील चित्रीकरण केले. त्यांचे अश्लील व्हिडिओ वेबसाइट आणि मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड केले, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.