‘मुळशी पॅटर्नच्या रिमेकच्या नावाखाली सलमानने कचराच केला’; प्रवीण तरडेंची टीका
![Pravin Tarde said that Salman did garbage in the name of remake of Mulshi Pattern](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/salman-khan-and-Pravin-Tarde-780x470.jpg)
पुणे : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचं कौतुक झालं होतं. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ नावाने रिमेक काढला. या रिमेकला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अंतिम सिनेमावर टीका केली आहे.
प्रवीण तरडे म्हणाले की, मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानने आपला कॉलर वर केला आणि म्हणाला..काय चित्रपट आहे, काय चित्रपट आहे. पण जेव्हा त्याने मुळशी पॅटर्नचा रिमेक केला, तेव्हा त्याने त्याची वाट लावली.
हेही वाचा – नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिचंवड मतदार संघात महाआरोग्य शिबीराचे आयोजन
महेश मांजरेकर सरांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. माझं त्या रिमेकशी काहीच घेणंदेणं नाही. पण आज मी हे सार्वजनिकरित्या सांगू इच्छितो की मी आजवर तो रिमेक पाहिला नाही. मी हे धाडस करूच शकत नाही कारण माझ्या डोक्यात आणि मनात फक्त मुळशी पॅटर्न आहे. मला लोकांनीही हेच सांगितलं की अंतिमपेक्षा मुळशी पॅटर्न हा चांगला चित्रपट आहे, असं प्रवीण तरडे म्हणाले.
उपेंद्र लिमये यांनी मुळशी पॅटर्न आणि अंतिम दोन्ही सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रवीण तरडे यांच्या विधानावरून उपेंद्र लिमये म्हणाले की, त्यात काही प्रश्नच नाही. मी दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं. मी हे स्पष्टपणे सांगू शकतो की तरडेंनी चित्रपटात मुळशीच्या मातीतील जी प्रामाणिकता दाखवली, ती रिमेकच्या नावाखाली नष्ट करण्यात आली. माझ्या मते त्यांनी जसाच्या तसा रिमेक केला असता, तरी लोकांना आवडलं असतं.