“मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Kapil Sharma : कॉमेडियन अभिनेता कपिल शर्माने कॅनडातील सरे शहरातील त्याच्या ‘कॅप्स कॅफे’वर झालेल्या फायरिंग प्रकरणांवर भाष्य केले आहे. कॅनडातील सरी येथील कॅप्स कॅफेवर पहिला हल्ला जुलैमध्ये, त्यानंतर दुसरा ऑगस्ट आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला होता. मात्र या घटनांमुळे कॅफेला उलट मोठी ओपनिंग मिळाली आणि स्थानिक लोकांचा पाठिंबाही वाढल्याचं त्याने सांगितले.
कपिलने सांगितले की, “गोळीबाराची घटना कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये घडली आणि तिथे तीन वेळा गोळीबार झाला आहे. मला वाटते की नियमांनुसार कदाचित तेथील पोलिसांकडे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे अधिकार नाहीत. आमच्या प्रकरणानंतर ह्या विषयाची थेट फेडरल सरकारपर्यंत गेला आणि कॅनडा संसदेतही चर्चा झाली. या घटनेनंतर लोकांनी खूप साथ दिली आणि आमच्या कॅफेला मोठी ओपनिंग मिळाली. देव माझ्यासोबत आहे त्यामुळे मला काही काळजी नाही.”
कपिल शर्माने पुढे सांगितले की, “अनेक लोकांनी त्याला फोन करून सांगितले होते की, कॅनडात यापूर्वीही अशा अनेक घटना घडत होत्या, पण जेव्हा त्याच्या कॅफेवर गोळीबार झाला, तेव्हा ती मोठी बातमी बनली. आता तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत,” असे त्याने सांगितले. यावेळी त्याने मुंबईबाबत अभिमान व्यक्त करत माझ्या देशात, विशेषत: मुंबईत, कधीही असुरक्षित वाटलं नसल्याचे देखील म्हंटले. कपिल त्याच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात बोलत होता.
कपिल शर्मा याच्या ‘किस किसको प्यार करूं 2’ चे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी यांनी केले असून, चित्रपटात तृप्ती डिमरी, शनाया कपूर, तरुण गहलोत आणि रवी किशन हे कलाकारही झळकणार आहेत.




