Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

‘भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते…’; पद्मविभूषण इलायाराजा

११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

पद्मविभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर  : समकालीन काळात संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असून संगीत वेगवान झाले आहे. वाद्यासह तयार होणारे संगीत हे आपल्या कानापर्यंत पोहचते मात्र, भावनांसह निर्माण होणारे संगीत हे हृदयापर्यंत पोहचते असे प्रतिपादन पद्मविभूषण इलायाराजा यांनी यावेळी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलायाराजा (राज्यसभा सदस्य) यांना त्यांच्या भारतीय सिनेमा संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी इलायाराजा यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सचिन मुळे, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना इलायाराजा म्हणाले, मी कोणताही विचार न करता थेट संगीत लिहितो. आतापर्यंत १५४५ चित्रपटांसाठी काम केले असून या प्रवासात १५४५ दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत कार्य करण्याची संधी मला मिळाली आहे. मी संगीत तयार करीत असताना काहीही नवीन तांत्रिक गोष्टी वापरत नाही. मी संगीतावर सातत्याने काम करत असून आजही संगीत शिकत आहे. आज सकाळीच माझ्या १५४५ व्या चित्रपटासाठी संगीत तयार करून मी या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहिलो आहे.
आज आपण पाहतो की, पियानोवर बोट ठेवलं की, संगीत तयार होत आहे. विशेषत: आज गावोगावी आणि घरोघरी संगीतकार आपल्याला पाहायला मिळतात. सराव, भावना आणि वाद्यापासून तयार होणारे संगीत सध्याच्या यांत्रिकतेच्या काळात मनाला भावणारे आहे. मला आज या ठिकाणी येऊन पद्मपाणि पुरस्कार स्वीकारत असताना मनापासून आनंद झाला आहे. या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो, असे इलायाराजा म्हणाले.

हेही वाचा – ‘आरटीई’चे थकित २२०० कोटी रुपये शाळांना कसे देणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

कुलपती अंकुशराव कदम अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ‘हे विश्वची माझे घर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून गेल्या दहा वर्षांत छत्रपती संभाजीनगर शहराला जागतिक सांस्कृतिक चळवळींशी सातत्याने जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलायाराजा यांना प्रदान करताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद होत आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदीसह मराठी भाषेतही त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत ७००० हून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीतनिर्मिती करणाऱ्या, भारतीय संगीताचा आत्मा असणाऱ्या पद्मविभूषण इलायाराजा यांनी पद्मपाणि पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

पद्मविभूषण इलायाराजा यांनी नऊ भाषांमध्ये सुमारे ७ हजारहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. चेन्नईहून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. या महोत्सवाचे इतिहाशी एक वेगळे नाते असून महोत्सवात पद्मपाणि, सुवर्ण कैलास असे विविध इतिहाशाची जोडणारे पुरस्कार दिले जातात. पुढच्या वर्षीपासून सुवर्ण शालीवाहन पुरस्कार मराठी चित्रपट स्पर्धेसाठी दिला जाणार आहे, असे संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले.

ऑस्कर विजेते ध्वनी संयोजनकार रसूल पुक्कुट्टी यावेळी बोलताना म्हणाले, पद्मविभूषण इलायाराजा हे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ, अतिशय दयाळू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. आम्हांला त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

या महोत्सवात एकूण ७० चित्रपट दाखविण्यात येणार असून हे माझे महोत्सवात कार्य करण्याचे दुसरे वर्ष आहे. विविध प्रकारच्या चित्रपट स्पर्धा या महोत्सवात आयोजित करण्यात आल्या असल्याचे दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी यावेळी सांगितले.

सभागृहात उपस्थित असलेल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर पद्मविभूषण इलायाराजा यांनी ‘जननी जननी…’ हे गाणे गायले. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगरची अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिव कदम यांनी केले.

अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दु:खद निधानबद्दल शोक संदेश व्यक्त केला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण केली. हा उद्घाटन सोहळा अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button