मुनव्वर फारूकीचं कोकणी माणसांबाबत वादग्रस्त विधान, नंतर मागितली माफी
![Munawwar Farooqui's controversial statement on Konkani people, later apologized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Munawar-Faruqui-780x470.jpg)
Munawar Faruqui | बिग बॉस १७ चा विजेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा सतत त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतो. बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या मुनव्वरने यावेळी पुन्हा एकदा असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. स्टँडअप कॉमेडी करताना मुनव्वरने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरत त्यांची खिल्ली उडवली. मात्र मनसेने त्याला चांगलाच हिसका दाखवला ज्यानंतर त्याने माफी मागितली आहे.
नेमकं काय म्हणला मुनव्वर?
मुनव्वर फारूकीने मुंबईतील एका शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की, तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का? त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर मुनव्वरने विचारलं कुठून आलात? त्यावर समोरचा म्हणाला, तळोजा..मुंबईबाहेरून आलोय. यावर मुनव्वर म्हणाला, हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय. अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात मुंबईत राहतो.. हे कोकणी लोक सगळ्यांना *** बनवतात, असं मुनव्वर म्हणताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
हेही वाचा – शहर राष्ट्रवादी काँग्रेस बचतगट महासंघ सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर
मुनव्वरने मागितली मराठी माणसाची माफी
हाय दोस्तांनो, मी आज या व्हिडीओतून काही गोष्टी स्पष्ट करायला आलो आहे. मी एक शो केला त्यामध्ये मी क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधत होतो. त्यात कोकणाचा विषय निघाला. तळोजामध्ये कोकणी लोक राहतात मला ठाऊक आहे. कारण माझे अनेक मित्र तिथे राहतात. मात्र जे बोललो ते जरा संदर्भ सोडून झालं. मी कोकणाची खिल्ली उडवली असं अनेकांना वाटलं. मात्र माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगू इच्छितो की क्राऊड वर्कमध्ये मी बोलून गेलो. मात्र मी पाहिलं की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कॉमेडियन आहे. माझं काम लोकांना हसवणं आहे दुखवणं नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, असं मुनव्वर फारूकी म्हणाला.