मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल, कोलकाता येथे उपचार सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-49-780x470.jpg)
Kolkata : अभिनेता आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता-राजकारणी बनलेल्या याला शनिवारी,१० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याची तब्येत बरी नसल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याच्यावर कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिथुन चक्रवर्ती ७३ वर्षांचे आहेत. शनिवारी, १० फेब्रुवारीला सकाळी मिथुन चक्रवर्ती यांना अचानक छातीत दुखू लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता काळजी करण्यासारखे काही नाही. त्याच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा – पुण्यातील निर्भया बनो सभेदरम्यान गोंधळ, पत्रकार निखिल वागळेंसह २०० जणांवर गुन्हे दाखल
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिथुन हे हिंदी चित्रपटसृष्टीत डिस्को डान्सर म्हणूनही ओळखले जातात. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी ‘परिवार’, ‘मेरा यार मेरा दुश्मन’, ‘बात बन जाए’ आणि ‘दीवाना तेरे नाम’ यांसारख्या सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टीव्ही शो ‘सारेगापामा’च्या एपिसोडमध्ये मिथुन प्रमुख पाहुणे म्हणून दिसला होता. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याने अनेक टीव्ही शोजही जज केले आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून अभिनेता मिथुन बंगाली चित्रपट ‘शास्त्री’च्या शूटिंगमध्ये कोलकाता येथे व्यस्त होता. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर मिथुन चक्रवर्ती शेवटचा बंगाली चित्रपट ‘काबुलीवाला’मध्ये दिसला होता. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात निवृत्त IAS ची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ देखील मिळाला होता.