#MeToo : गणेश आचार्यांचं तनुश्री दत्ताला प्रत्युत्तर
#MeToo प्रकरणामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तिला प्रत्युत्तर दिलं आहे. तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचं गणेश आचार्यने म्हटलं आहे.
‘गणेश आचार्य हा खोटारडा असून तो दुतोंडीदेखील आहे. त्याला माझ्यामुळे काम मिळलं पण तो हे सोयीस्कररित्या विसरला आहे , त्यानं माझा विश्वासघात केला आहे. नाना पाटेकर यांना गणेश आचार्य पाठिंबा असून तो नानाच्या कृतीत सहभागी होता’, असा आरोप तनुश्रीने केला होता. तनुश्रीच्या या आरोपानंतर गणेश आचार्यने हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने त्याचं मौन सोडलं असून तनुश्री खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.
‘हॉर्न ओके प्लीज’ सेटवर डान्सचा सराव सुरु असताना तो तनुश्रीला नीट जमत नव्हता. तिची ही चूक लपविण्यासाठी तिने #MeToo च्या माध्यमातून साऱ्यांवर आरोप केल्याचं गणेश आचार्य यांनी वकिलांमार्फत जारी केलेल्या १२ पानांचं एक पत्र नमूद केलं आहे.
‘२००८ मध्ये १७ ते २० मार्च या कालावधी शरीक हॉलमध्ये या गृप डान्सचा सराव सुरु होता. या गाण्यासाठी १०० डान्सर्सला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र प्रत्येक सरावादरम्यान तनुश्री ना ना तऱ्हेचे बहाणे पुढे करत असते. त्यामुळे माझ्या असिस्टंटला देखील त्याचा त्रास झाला होता’, असं गणेश आचार्य यांनी म्हटलं आहे.