सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात वाढ, मनाई आदेश जारी
![Increase in police security in Sindhudurg district, prohibition order issued](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/sindhudurg.jpg)
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात वाढ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि राणे यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बंदोबंस्तासाठी पोलीस कुमक मागवण्यात आल्या आहे. तसेच मनाई आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला जिल्ह्यातील परिस्थिती पाहूनच परवानगी दिली जाणार आहे, असेही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले.नाशिकमध्ये राणे यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली गेली. शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अटकेसाठी आंदोलने सुरू केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले व शिवसेनेने आंदोलन सुरू केले.
राणे यांना रत्नागिरीत अटक केल्यानंतर भाजपने आंदोलन सुरू केले त्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक अलर्टवर आहे. जिल्ह्यात शिवसेना व भाजप यांच्यात संघर्ष होऊ नये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमाव करता येणार नाही.सभा मिरवणुका काढता येणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.