#HBD दीपिका पादुकोण : मॉडेल ते मस्तानीचा प्रवास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/्गजगको.jpg)
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका नुकतीच रणवीर सिंहसोबत विवाह बंधनात अडकली आहे.
५ जानेवारी १९८६ रोजी जन्मलेल्या दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण बॅडमिंटन खेळाडू आहेत. सुरुवातीला दीपिकाचीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठी बॅडमिंटन खेळाडू बनण्याची इच्छा होती. ती राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. परंतु, नंतर दीपिका मॉडेलिंग क्षेत्राकडे आकर्षित झाली. केवळ १७ वर्षाची असताना दीपिकाने रॅम्पवॉक केला. किंगफिशरच्या मॉडेलिंग कॅलेंडर शूटमुळे
सर्वांच्या नजरा दीपिकावर टिकल्या. यानंतर दीपिका लिरिल, डाबर, क्लोजअपसारख्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये झळकली. दीपिकाने आपल्या शालेय अवस्थेत भरत नाट्यमही शिकले आहे.
दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला होता. यानंतर २००७ साली शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे दीपिकाला अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर आल्या. लव आज कल, कॉकटेल, चेन्नई एक्सप्रेस, गोलियों की रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावतसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दीपिकाने आतापर्यंत बॉलीवूडला दिले आहेत. दीपिका लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात झळकणार आहे.