बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, चारवेळा झाली फायरिंग; पोलिसांकडून तपास सुरू

Rohit Shetty Firing : मुंबईतील जुहू परिसरातील बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर १ फेब्रुवारीच्या पहाटे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. चारवेळा गोळीबाराचा आवाज आल्याचं म्हटलं जातंय. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, या घटनेदरम्यान रोहित शेट्टी घरात होता की नाही हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोळीबारामागील हेतू अद्याप समजू शकलेले नाही, असं पोलिसांनी सांगितलं. जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक संभाव्य दृष्टिकोनाचा शोध घेत आहेत. तसंच, शेट्टीच्या जुहू टॉवरभोवती कडक सुरक्षा तैनात करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शेट्टीच्या घरावर तीन बुलेटच्या खुणा सापडल्या आहेत. १२ तपास पथक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी केली जात आहे. तसंच, बंगल्यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा –LPG… FASTag ते पान मसाल्यापर्यंत, आजपासून देशात हे ५ मोठे बदल लागू
रोहित शेट्टीचा २०२४ साली सिंघम अगेन हा चित्रपट आला होता. या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जवळजवळ ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाचे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे ४०० कोटी रुपये होते. या अॅक्शन चित्रपटाला रोहित शेट्टी पिक्चर्स, रिलायन्स एंटरटेनमेंट, जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स यांनी संयुक्तपणे पाठिंबा दिला आहे. तसंच, सध्या तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम आयपीएस राकेश मारिया यांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रोहित शेट्टीने नुकतीच GMC Hummer EV ही आलिशान इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खरेदी केली आहे. भारतात या कारची किंमत सुमारे ४.५७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोहित शेट्टी हा बॉलीवूडमधील सर्वांत महागड्या गाड्या असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक ठरला आहे.
रोहितकडे याआधी Ford Mustang, Range Rover Sport, Mercedes-Benz AMG G63 व Lamborghini Urus यांसारख्या काही अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत ८० लाखांपासून ३.५ कोटी रुपयांपर्यंत आहे. रोहित शेट्टी अनेकदा त्याच्या कार्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अशातच त्याचा GMC Hummer EV मधून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.




