Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीकोकण विभागताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ विभाग

गणेशोत्सव २०२५ : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे थाटात आगमन, राज्यात जल्लोषाचा माहोल!

राज्यभरात भक्ती-आनंदाचा उत्सव; कलाकारांच्या घरीही गणरायाचे आगमन

मुंबई/पुणे/जळगाव | प्रतिनिधी : “ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला…” अशा घोषणांनी राज्यभरात गणेशोत्सव २०२५ चा प्रारंभ झाला. आज सकाळपासूनच घरोघरी व विविध मंडळांत गणरायाचं आगमन उत्साहात सुरू असून, ढोल-ताशांच्या नादात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले आहे.

मुंबई : लालबागचा राजा आगमन दर्शनासाठी गर्दी

मुंबईतील प्रमुख मानाच्या गणपतींच्या आगमन मिरवणुका दिमाखात निघाल्या. विशेषत: लालबाग-परळ परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचे यंदा ७१ वे वर्ष असून, मूर्तीवर ६९ किलो सोने व ३६५ किलो चांदीचा अलंकार करण्यात आला आहे. यावर्षी मंडळाने तब्बल ४७४ कोटींचा विमा कवच घेतला आहे.

गणेश गल्ली मंडळाची रामनाथस्वामी मंदिर प्रतिकृती

मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या आध्यात्मिक व सांस्कृतिक थीममुळे गणेशोत्सवाला अधिक भव्यता लाभली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील परब व उपाध्यक्ष सिद्धेश कोरगावकर यांनी सांगितले.

पुण्यात मानाच्या गणपतींचे स्वागत

पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा ढोल-ताशांच्या गजरात होत आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीत अबालवृद्ध थिरकले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी सजवलेला रथ हा विशेष आकर्षण ठरला आहे. रथावर फुलांची सजावट व विष्णूची मूर्ती विराजमान करून भक्तीभावाचा रंग भरला आहे.

पोलिसांचे अत्याधुनिक सुरक्षा कवच

पुणे शहरात यंदा तब्बल ३९५९ सार्वजनिक मंडळे व ७४,५९४ घरगुती गणेशमूर्ती बसणार आहेत. यासाठी पोलीस दलाने सीसीटीव्ही, ड्रोन सर्व्हेलन्स, जीपीएस ट्रॅकिंग, अँटी-ड्रोन गन्स व मेटल डिटेक्टर अशी आधुनिक यंत्रणा तैनात केली आहे. मध्यवर्ती भागात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली असून, कायद्याचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात ३ हजार गणेश मंडळे

जळगाव जिल्ह्यातही गणेशोत्सव जल्लोषात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ३ हजार सार्वजनिक गणेश मंडळे व १६० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमांतर्गत मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलाचे ३४०० कर्मचारी, १८०० होमगार्ड व एसआरपीएफची तुकडी बंदोबस्तासाठी सज्ज आहे.

राजकीय रंगही चढला

मुंबईतील गिरगाव परिसरात गणेशमंडळांनी बाप्पाच्या स्वागतासोबतच बॅनरद्वारे राजकीय संदेश दिला आहे. “हक्काच्या घरासाठी ठाकरे बंधूंचे सरकार यावे” असा आशय असलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

राज्यभरात उत्साह

नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, बीड, लातूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली अशा जिल्ह्यांत गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. तर बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button