चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांचा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे IFTDA चा संताप

मुंबई : आशिया कप 2025 मध्ये रविवारी, 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत क्रिकेट सामना होणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्साहित आहेत, तर दुसरीकडे अनेकजण या सामन्याचा विरोध करत आहेत. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तातडीने रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. यासाठी त्यांनी एक सविस्तर पत्र लिहिले आहे. दुसरीकडे, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन (IFTDA) चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोध करत याला देशासाठी काळा दिवस म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला क्रिकेट सामना आहे. अशोक पंडित यांनी कठोर शब्दांत सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आणि आयोजकांना असंवेदनशील ठरवले. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 140 कोटी भारतीयांसह आज 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा तीव्र निषेध करतो आणि त्याचा विरोध करतो.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
भारतात चित्रपटांवरील बंदीचा उल्लेख
पत्रात पुढे लिहिले आहे, ‘ज्या वेळी आपला देश जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा शोक करत आहे, जिथे 26 निरपराध भारतीयांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर क्रूरपणे मारले, अशा वेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे हे आपल्या शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे.’ पुढे त्यांनी सांगितले की, भारत सरकारने यापूर्वीच पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक पावले उचलली आहेत. AICWA ने यापूर्वीच पाकिस्तानी कलाकार आणि ‘सरदार जी 3’ सारख्या चित्रपटांवर भारतात बंदी घातली होती.
BCCI च्या हेतूंवर प्रश्न
AICWA ने पत्रात लिहिले आहे, ‘आम्ही नेहमी आपल्या देशातील लोकांसोबत ठामपणे उभे राहिलो आहोत, पण BCCI राष्ट्राच्या गौरवापेक्षा पैशाला प्राधान्य देत असल्याचे दिसते आणि खेळाच्या नावाखाली दहशतवादी देशाशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. BCCI साठी क्रिकेट सर्वोच्च असले तरी भारतातील लोकांसाठी आपला देश प्रथम येतो.’ AICWA ने या सामन्याला तातडीने रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. तसेच, भारत-पाक सामना आयोजित करणे हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवादात आपले प्राण गमावलेल्या सैनिक आणि नागरिकांच्या बलिदानाशी विश्वासघात आहे, असे म्हटले आहे. संघटनेने देशातील नागरिकांना या सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्मात्यांना या सामन्याचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे.