युट्युबर कॅरीमिनाटीला न्यायालयाचा दणका, व्हिडिओ हटवण्याचे आदेश

Carryminati | बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्याविरोधात समाजमाध्यमांवर बदनामीकारक, अश्लील आणि अपमानास्पद मजकूर प्रसारित करण्यास कनिष्ठ न्यायालयाने युट्युबर अजय नागर याला मज्जाव केला आहे. तसेच, करण जोहर यांना लक्ष्य करणारे सर्व संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवरून तत्काळ हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कॅरीमिनाटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अजय नागरविरोधात करण जोहर यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान करण जोहर यांनी समाजमाध्यमांवरील व्हिडिओंद्वारे आपली थट्टा करण्यात आल्याचा तसेच आपली प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यांनी संबंधित सर्व व्हिडिओ आणि मजकूर तात्काळ हटवण्याची मागणीही न्यायालयाकडे केली होती.
दुसरीकडे, संबंधित सर्व व्हिडिओ आणि मजकूर आधीच हटवण्यात आल्याने पुढील कारवाईचे कारण उरत नसल्याचा युक्तिवाद अजय नागर यांच्या वतीने करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या (सकृतदर्शनी) नागर व अन्य प्रतिवादींकडून करण जोहर यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचे तसेच असभ्य भाषेचा वापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. त्यानुसार, न्यायालयाने अजय नागर यांना भविष्यात करण जोहर यांच्याविरुद्ध कोणताही आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यास मज्जाव करणारा अंतरिम आदेश जारी केला. या निर्णयामुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांमधील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




