“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”
!["Chief Minister Uddhav Thackeray has time to go to Dilip Kumar's house, but not to meet Swapnil Lonakar's mother"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/E5t0KImX0AgPTfH.jpg)
मुंबई |
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. हिंदूजा रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात जुहू येथील दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलावंतांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंना स्वप्नील लोणकरच्या घऱी जाण्यासाठी वेळ नाही, मात्र तिथे जाण्यासाठी वेळ होता असं सांगत नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करतानाचा फोटोही शेअर केला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा. त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण सत्य”.
- उद्धव ठाकरेंकडून सांत्वन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी खार येईल निवासस्थानी जाऊन दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं व कुटुंबियांचे सांत्वन केले. उद्धव ठाकरेंनी अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
- स्वप्निल लोणकर आत्महत्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. स्वप्नील लोणकरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून नैराश्यातून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. गंगानगर, हडपसर) २०१९ च्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेले दीड वर्ष त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर त्याने पुन्हा परीक्षा दिली होती. या पूर्व परीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. करोनाच्या संसर्गामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. ३० जून रोजी सकाळी त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी उघडकीस आले.