आशा भोसले यांची आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव
वैयक्तीक हक्कांच्या रक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमेरिकेतील दोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्लॅटफॉर्म ऑडिओ आणि व्हिज्युअल सामग्री तयार करण्यासाठी अत्याधुनिक अल्गोरिदम वापरतात. यात त्यांनी ‘एआय’द्वारे आशाताईंचा आवाज, त्यांची गायन शैली यांची हुबेहूब नक्कल करत आपल्या रेकॉर्डिंगमध्ये या आवाजाचा बेकायदेशीररित्या वापर केला आहे. त्यामुळे आशा भोसले यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हायकोर्टाने काय म्हटले?
आशा भोसले यांचे वकील अंकित लोहिया यांनी वैयक्तीक हक्कांच्या रक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी झाली. या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टानं आशा भोसले यांना अंतरिम दिलासा देण्याबाबत लवकरच सविस्तर आदेश जारी केले जातील अशी माहिती दिली आहे. सध्या सुनावणी दोन आठड्यांसाठी तहकूब केली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
आपल्या आवाजाचा आणि शैलीचा गैरवापर केल्याचा आरोप आशा भोसले यांनी केला आहे. याआधी असाच प्रकार गायक अरिजीत सिंग यांच्याबाबत झाला होता. त्यावेळी कोर्टाने अरिजीत सिंगला दिलासा दिला होता अशी माहितीही आशा भोसले यांच्या वकीलावे कोर्टात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी असं आशा भोसले यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
आशा भोसले कोण आहेत?
आशा भोसले या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये 12 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, पॉप, गझल, भजन, कॅबरे अशा विविध शैलींमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांना पद्म विभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यासारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. भारतीय संगीतविश्वात त्यांचे योगदान अमूल्य आहे. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने जो दिल को”, “इन आँखों की मस्ती”, “तुमसे मिलके” ही आशा भोसले यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.