‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत आणि रणवीर सिंग एकत्र येणार? चर्चा होतीये एका मोठ्या चित्रपटाची
!['Adipurush' director Om Raut and Ranveer Singh to come together? A big movie is being discussed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/ranveer-singh-om-raut-780x470.jpg)
‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीझरमुळे सध्या लोक त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. एकूणच चित्रपटातील व्हीएफएक्स आणि रामायणाचं केलेलं चित्रण यामुळे या चित्रपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. अशातच ओम राऊत हे लवकरच बॉलिवूड स्टार रणवीर सिंगबरोबर आणखी एक चित्रपट करणार असल्याची बातमी समोर येत आहे.
‘बॉलिवूड हंगामाच्या’ सूत्राने याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “ओम राऊत यांनी रणवीरला त्याच्या पुढच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची ऑफर दिली आहे. हा चित्रपट संपूर्णपणे व्हीएफएक्सवर बेतलेला असेल ज्यामध्ये ओम राऊत संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी AI-प्रेरित तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न करणार आहे.” आतापर्यंत रणवीरला या चित्रपटाची मूळ संकल्पना आवडली आहे. खरे तर ओम राऊत यांच्यासोबत चित्रपटाचा पटकथेवर चर्चा सुरू आहे त्यामुळे याबद्दल आणखी माहिती मिळणं कठीण आहे.
अर्थात रणवीर आणि ओम राऊत यांच्यात फक्त या चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल चर्चा सुरू आहे, याचा अर्थ रणवीर हा चित्रपट करेलच असं नाही हेदेखील या सूत्राने सांगितलं. खरंच जर रणवीर आणि ओम राऊत एकत्र आले तर एक वेगळीच जादू मोठ्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
https://www.instagram.com/omraut/?utm_source=ig_embed&ig_rid=c145e28b-2e7e-4df0-8e50-be53fc5b3d70
ओम राऊत सध्या त्यांच्या ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पुढील वर्षात प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तो आणि आलिया भट्ट ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत.