अभिनेत्री रेणुका शहाणेला कोरोनाची लागण, आशुतोष राणांनंतर संपूर्ण कुटुंब बाधित
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यातच, आज प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेणुकाचे पती आशुतोष राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या संपूूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे.
शनिवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी आशुतोष राणा यांची पत्नी रेणूका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र या सगळ्यांची कोेरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत. या आधी आशुतोष राणाने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. आशुतोष राणा आणि रेणूका शहाणे या दोघांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि रेणूका या दोघांनीही कोरोनाची पहिली लस घेतली होती.
दरम्यान, शनिवारी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यात अर्जुन रामपाल, नील नितीन मुकेश, सोनू सूद आणि मनिष मल्होत्राची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. या आधी आलीया भट्ट, रणबीर कपूर, अक्षय कुमार, गोविंदा आणि कार्तिक आर्यन यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती.