वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर पुण्यात गुन्हा
![Actress Payal Rohatgi charged in Pune over controversial statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Payal-Rohatgi.jpg)
पुणे – अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा मोठ्या अडचणीत आली असून तिच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.
पायलने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस परिवाराबाबत खोटा, बदनामीकारक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिथून तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही पायल रोहतगीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा गांधी यांच्याबद्दलही फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यावेळी तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून झाली होती.