अभिनेता विक्रांत मेस्सीचा अभिनयातून संन्यास! सोशल मीडियावर दिली माहिती
Vikrant Massey | बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने १ डिसेंबरच्या पहाटे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. ’12th फेल’, ‘सेक्टर 36’ आणि ‘दिलरुबा’ सारखे आशयभिन्नता असणारे सिनेमे देणाऱ्या विक्रांतने २ डिसेंबर रोजी एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
विक्रांत मोस्सीने पोस्टमध्ये लिहिले की, नमस्ते, मागील काही वर्षे आणि त्यानंतरचा काळ विलक्षण होता. आपल्या अखंड पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसे मी पुढे जात आहे, तसतसे मला जाणवू लागले आहे की आता स्वत: ला पुन्हा शस्त्रसज्ज करण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही… त्यामुळे २०२५ मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. शेवटचे दोन सिनेमे आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी आणि मधल्या काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी… मी कायम ऋणी राहीन. यासोबतच अभिनेत्याने हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.
हेही वाचा – राज्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता, महाराष्ट्रात यलो अलर्ट
विक्रांतने ही पोस्ट केल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्याला हा निर्णय घेऊ नकोस असं म्हटलं आहे. तर काहींना हार्टब्रेक झालेले इमोजी कमेंट केले आहेत. तू भारतातील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहेस, त्यामुळे इंडस्ट्री सोडून जाऊ नकोस, असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री इशा गुप्ताने विक्रांतच्या या पोस्टवर त्याचं नाव व रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.