पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे विरोधकांनी हे प्रकरण लावून धरंल होतं. अखेर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होत. अशातच या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे सोपवण्यात यावी आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायाधीस एस पी देशमुख आणि गिरीश कुलकर्णी यांच्या बेंचसमोर या प्रकरणात सुनावणी सुरु होती.
या प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडताना वकील दीपक ठाकरे यांनी चित्रा वाघ यांना अशा प्रकारची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला. यावर न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणात मयत मुलीच्या नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली होती का?, अशी विचारणा केली. तेव्हा वकील अतुल दामले यांनी बाजू मांडताना मयत मुलीच्या काही नातेवाईकांना धमक्या मिळत असून या प्रकरणाच्या तपासात फेब्रुवारीपासून कोणतीही प्रगती झालेली नसल्याची माहिती दिली.
दरम्यान, कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेत, पुरावा असताना गुन्हा का दाखल करून घेतला नाही, अशी विचारणा सरकारला केली आहे. तर यासोबतच येत्या दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर दाखल करण्याते आदेश दिले आहेत.