23 वर्षांपूर्वी सैफ अली खानने स्मृती इराणींना दिला होता ‘हा’ खास सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Smriti-Irani-and-Saif-Ali-Khan-620x400.jpg)
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे 23 वर्षांपूर्वी दिलेल्या त्या सल्ल्याबद्दल आभार मानले आहेत. स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खानसोबत घेतलेला सेल्फी पोस्ट करत 1995 मधील त्या भेटीची आठवण सांगितली आहे. स्मृती इराणी यांनी पोस्टमध्ये सैफ अली खानच्या त्या सल्ल्याने आपल्या पंखात बळ दिल्याचं सांगितलं आहे. या सल्ल्यानंतर आपण स्वप्नाचं विमान सोडून जेटवर स्वार झाल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
इशा अंबानी आणि आनंद पिरामलच्या लग्नात स्मृती इराणी आणि सैफ अली खानची भेट झाली. या लग्नासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी स्मृती इराणींनी सैफ अली खानसोबत सेल्फी काढला. सेल्फी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत स्मृती इराणींनी लिहिलं आहे की, ’23 वर्षांपूर्वी दिल्लीहून आलेल्या एका शिकाऊ तरुणीला एका रायजिंग स्टारने (सैफ अली खान) कशा पद्धतीने आपण टिकून राहायचं हे सांगितलं होतं. त्यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या ज्याच्या मदतीने आपण आपली स्वप्नं पूर्ण कऱण्यासाठी संघर्ष करु शकू. त्यांना माहिती होतं की, ही तरुणी पुढे जाऊन स्टार होईल. त्या आठवणींसाठी धन्यवाद सैफ अली खान’.
स्मृती इराणी यांनी राजकारणात येण्याआधी छोटा पडदा गाजवला आहे. त्या एक मोठ्या टीव्ही स्टार होत्या. त्या मिस इंडियाच्या स्पर्धेकही होत्या. एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी खुलासा केला होता की, आपल्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा व्यक्तिमत्व ठीक नसल्याचं सांगत नोकरी नाकारण्यात आली होती. त्यांनी सांगितलं होतं की, जेट एअरवेजने त्यांना केबिन क्रू मध्ये सहभागी करुन घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्या मुंबईला आल्या आणि एकता कपूरची लोकप्रिय मालिका..क्यूंकी सास भी कभी बहू थी मध्ये तुलसी विरानीची भूमिका करत प्रसिद्धी मिळवली.
2003 मध्ये त्यांचा राजकीय जीवनाला सुरुवात झाली. भाजपात प्रवेश करत त्यांनी दिल्लीमधील चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2004 मध्ये त्यांना महाराष्ट्र यूथ विंगचं उपाध्यक्ष करण्यात आलं होतं.