ही तर हद्दच! टास्कदरम्यान सिद्धार्थला दिला जबरदस्त त्रास
‘बिग बॉस’ हिंदीचे तेरावे पर्व सुरू झाले असून त्यातील वादविवादांची चर्चासुद्धा त्यापाठोपाठ सुरू झाली आहे. ‘बिग बॉस’ आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. पण यंदाच्या पर्वात स्पर्धकांनी त्याची हद्दच ओलांडली आहे. ‘कलर्स टीव्ही’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी एपिसोड्सची झलक दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एका टास्कदरम्यान अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला जबरदस्त शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचं पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’मध्ये सध्या ‘हॉस्पीटल टास्क’ सुरू आहे. या टास्कसाठी घरात दोन गट पाडले गेले. एक गट डॉक्टरांचा तर एक रुग्णांचा. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी स्पर्धकांना जास्तीत जास्त वेळ एका खुर्चीवर बसावे लागणार आहे. तर विरोधी गटातील स्पर्धक त्यांना खुर्चीवरून उठवण्यासाठी हरएक प्रयत्न करत आहेत. यावेळी सिद्धार्थ खुर्चीवर बसला आणि त्याला त्रास देण्यासाठी विरोधी गटातील स्पर्धकांनी त्याच्या अंगावर चिखल, शेण, मातीचे पाणी टाकले. इतकंच नव्हे तर त्याच्या अंगावर बर्फही ठेवला. हे सगळं सहन करत सिद्धार्थ त्या खुर्चीवर बसला होता.
सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावेळी स्पर्धकांनी हद्दच ओलांडल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहे. तर पैशासाठी हे स्पर्धक काहीही करू शकतात अशी टीकाही काही युजर्स करत आहेत.