संजय लिला भंसाली-सलमान खान पुन्हा एकत्र येणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sanjay-leela-salman.jpg)
बॉलीवुडचा चुलबुल पांडे अर्थात सलमान खान त्याच्या आगामी “रेस 3′ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 15 जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन रेमो डिसूझा याने केले आहे. त्यानंतर सलमानचे एका पाठोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. यामध्ये संजय लिला भंसाली यांच्या दिग्दर्शनाखालीलही एक चित्रपट आहे.
सलमान खान आता कोणताही नवीन चित्रपट साईन करण्यापूर्वी आपल्या आवडत्या दिग्दर्शक संजय लिला भंसाली यांच्या चित्रपटात काम करू शकतो. याबाबत सलमानने दुजोरा दिला असून नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने संजय लिला भंसाली यांच्या सोबतच्या एका चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तसेच भंसाली यांनीही गतवर्षी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
ही जोडी तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहे. यापूर्वी या जोडीने “हम दिल दे चुके सनम’ आणि “खामोशी’ यासारखे सुपर हिट चित्रपट दिलेले आहेत. दरम्यान, सलमान आणि भंसाली यांच्यात “देवदास’ या चित्रपटात त्याच्या ऐवजी शाहरुख खानला कास्ट केल्यापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण होत गेला. मात्र, आता पुन्हा एकदा भंसाली सलमान खान सोबतच्या आपल्या आगामी चित्रपटासाठी दीपिका पादुकोणशी चर्चा करत आहे. पण अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.