वाढदिवसानिमित्त रणवीरने शेअर केला ’83’ चित्रपटातील फर्स्ट लुक
आज ६ जुलै बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंगचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रणवीरने त्याचा आगामी चित्रपट ’83’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. रणवीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याला कपील देव यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. आता रणवीरनेच त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा हा फोटो शेअर केला आहे. ‘माझ्या आयुष्यातील खास दिनानिमित्त, तुमच्यासाठी कपिल देव यांच्या भूमिकेतील माझा लूक’ असे कॅप्शन दिले आहे. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या फोटोमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्या सारखा दिसत आहे.
२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. सध्या ’83’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.