वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टीवल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/iceleopard-504x420.jpg)
वन्यजीव छायाचित्रकाराला नेहमी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो : राजेश बेदी
पुणे- “हिमबिबट्याच्या चित्रीकरणासाठी आम्ही एका ठिकाणी तब्बल 22 दिवस राहिलो. यादरम्यान एकदाही त्याचे दर्शन झाले नाही. 23 व्या दिवशी एका उंचीवरील ठिकाणी हिमबिबट्या असल्याची माहिती मिळाली. सर्वसामानासहित मी आणि माझा भाऊ त्या ठिकाणी पोहोचलो. त्या उणे 22 अंश तापमानात सर्व तयारी करून त्याच्या येण्याची वाट पाहात होतो. मात्र सकाळपासून संध्याकाळ झाली तरी तो बिबट्या खाली आला नाही. संधाकाळी केव्हातरी तो आला, पण अंधारामुळे त्याचे चित्रीकरण करता आले नाही. इतकी मेहनत घेऊन एकदाही त्याला टिपता आले नाही, याचे वाईट वाटले. पण एका वन्यजीव छायाचित्रकाराला नेहमीच या गोष्टीचा सामना करावा लागतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कॅमेऱ्याद्वारे जादू करणे हेच वन्यजीव छायाचित्रकाराचे कसब असते, अशा शब्दांत वन्यजीव चित्रपटकर्ते राजेश बेदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नेचर वॉक आणि ऍडवेंचर फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित भारतीय वन्यजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या “वाइल्ड लाइफ इंडिया’ या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, क्रेडाईचे संजय देशपांडे, महोत्सवाचे संयोजक अनुज खरे, प्रशांत कोठडिया उपस्थित होते. यावेळी उणे तापमानात तुम्ही साहित्याची देखभाल कशी करता? प्राण्यांचे विश्व अनुभवताना तुम्हाला काय अनुभव आले? वन्यजीव छायाचित्रकार बनण्यासाठी काय करावे लागेल? अशा विविध प्रश्नांना बेदी यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
बेदी म्हणाले, “वन्यजीवांबाबत चित्रीकरण करताना पैसे, परिस्थिती अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा तुम्हाला इच्छा असूनही तुम्हाला काही अद्धुत क्षण टिपता येत नाही, तर अनेक दिवस घालवल्यानंतही त्या प्राण्याचे दर्शनही होत नसल्याने नैराश्यदेखील येऊ शकते. पण, अशा परिस्थितीत संयमित राहून आपले काम करायचे. चांगले काम नक्कीच तुमच्या सर्व समस्या सडवते.’
खांडेकर म्हणाले, “सोशल मिडीयामुळे नागरिकांना विशेषत: तरुणाईला जैवविविधतेबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते. त्यामुळे अलीकडे लोकांमध्ये वन्यप्राण्यांविषयक जागृती वाढली आहे, तिला एक योग्य दिशा देण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून वनांबद्दल, वन्यजीवनाबद्दल होणारे चांगले काम लोकांच्या समोर येऊन इतरांनाही कामांचे प्रोत्साहन मिळते.
महोत्सवादरम्यान भारतीय वन्यजीवांवर आधारित 25 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच विविध वन्यजीव छायाचित्रकारांशी संवाद साधण्याची संधीदेखील यानिमित्ताने मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मुग्धा वाघ यांनी मानले.