रोहित शेट्टीच्या या चित्रपटात एकत्र येणार ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंगम’?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/rohit-shetty.jpg)
अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटले की दिग्दर्शक रोहित शेट्टी डोळ्यासमोर उभा राहतो. सध्या रोहित शेट्टी त्याचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्यातच रोहित आणखी एक नवा चित्रपट घेऊन येणार असल्याचे समोर आले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे.
‘डेक्कन क्रोनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्याच आठड्यात रोहित शेट्टीने त्याच्या नव्या चित्रपटाच्या नावाची नोंदणी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशन’मध्ये केली असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे नाव ‘आया पोलिस’ असे आहे. तसेच हे नाव रोहित शेट्टीने त्याच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आला रे आला’ या गाण्यातील काही शब्दांवरुन ठेवले असल्याचे म्हटले जात आहे.
रोहित शेट्टीने या चित्रपटाबाबत कोणताही खुलासा अद्याप केलेले नाही. चित्रपटात कोणते कलाकार दिसणार, चित्रपटाची कथा काय असणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडू लागले आहेत. तसेच या चित्रपटात ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंगम’ यांना एकत्र पाहायला मिळणार अशा देखील चर्चा सुरु आहेत. आता चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.
याआधी रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यानंतर आता रोहित शेट्टी त्याचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. परंतु चाहत्यांना या चित्रपटात अक्षयसह कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता लागली आहे.