रियासह कुटुंबाला मुंबई पोलिसांची सुरक्षा
मुंबई – सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून रियाच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होत आहे. रियाने याबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर सीबीआयने रियाचं घर ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या प्रवासासाठी रियाला सुरक्षा देण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती. दरम्यान, रियाची शुक्रवारी (28 ऑगस्ट) 10 तास सीबीआय चौकशी झाली. आज पुन्हा तिची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सिद्धार्थ पिठानीची बीकेसी ऑफिसला 12 तास चौकशी झाली.
सीबीआय सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलने रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. रियाने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत विमानाची भीती वाटत असल्याने विमानात बसण्याआधी मोडाफीन औषध घ्यायचा असं म्हटलं होतं. तिने स्वतः ड्रग्जचं सेवन कधीच केलं नाही, असंही तिने सांगितलं होतं. रिया सुशांतसोबत एप्रिल 2019 ते 8 जून 2020 या कालावधीत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र ज्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप झालाय त्यांच्यासोबत ती 2017 पासून संपर्कात असल्याचं समोर आलंय. रियाच्या चॅटमुळे ड्रग्जचा संशय बळावल्याचं बोललं जात आहे.