राधाकृष्णाच्या प्रेमाच्या कथेवरही होणार सिनेमा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/radha.jpg)
बॉलिवूडमध्ये अनेक रोमॅंटिक सिनेमे झाले मात्र पौराणिक कथेतील प्रेमकथेवर व्यवसायिक चित्रपट झाल्याचे ऐकिवात नाही. हे धाडस करण्याचे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनमेंट आणि इम्तियाझ अली यांनी ठरवले आहे. त्यांनी राधाकृष्णाच्या प्रेमकथेवर सिनेमा बनवण्याचा घाट घातला आहे. “जब वुई मेट’, “लव्ह आजकल’ आणि “रॉकस्टार’ सारख्या सिनेमांमधील आधुनिक प्रेमकथेचे वेगवेगळे पैलू दाखवणाऱ्या इम्तियाझ अलीने अनेक पिढ्यांमधून प्रचलित कथा निवडली आहे. तसेच संस्कृती आणि भौगोलिक सीमांचे बंधनही आता ओलांडले आहे.
जन्माष्टमीच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा इम्तियाझ अलीने केली आहे. प्रेमाचे उथळ चित्र पाहणाऱ्या प्रेक्षकांना या प्रेमाचा अर्थ उलगडून दाखवणे किती आव्हानात्मक आहे, याची आपल्याला जाणीव असल्याचेही त्याने सांगितले आहे. राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचा उल्लेख महाभारतासह अन्य काही महाकाव्यात आलेला आहे. याचा सविस्त अभ्यास करून या चित्रपटाची कथा लिहीली जाणार आहे. या सिनेमातील कलाकार किंवा अन्य तपशीलांची इम्तियाझने अद्याप निश्चिती केलेली नाही. पण लवकरच हे बाकीचे तपशीलही समजतील. कदाचित पुढच्या वर्षी या राधाकृष्णाच्या प्रेमकथेवरील सिनेमाची पोस्तर्स झळकलेली असतील.