रजनीकांत आणि अक्षयचा “2.0’देखील अडचणीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/2.0-.jpg)
सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘2.0’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटाच्या वाटेत अडचणी आल्याचेही दिसते आहे. “सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (सीओएआय)ने सेन्सॉर बोर्डाकडे या चित्रपटाला विरोध केला आहे. सेन्सॉरक़डून देण्यात आलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोबाईल फोन आणि दूरसंचार क्षेत्राचे या चित्रपटातून करण्यात आलेले चित्रण हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे “सीओएआय’ने हा विरोध केला आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवर्स कशा प्रकारे सजीव प्रजातींना घातक आहेत, याचे चित्रण चित्रपटातून करण्यात आले आहे. “2.0’ला सेन्सॉरकडून यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले होते. पण, आता ते प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी केली गेली आहे.
त्याशिवाय या चित्रपटाच्या प्रमोशनल व्हिडिओसाठीचे प्रमाणपत्रही लगेचच मागे घ्यावं ही त्यांची मागणी आहे. तेव्हा आता याविषयी सेन्सऱ काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 543 कोटी इतका सर्वाधिक खर्च झालेला हा चित्रपट जवळपास 7000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होतो आहे. एकूण 14 भाषांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.