रकुल प्रीत सिंह एनसीबी कार्यालयात पोहोचली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rakul_preet_singh_ncb.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टी गदागदा हलवली आहे. या मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स अँगलबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. यापैकी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज एनसीबीसमोर हजर होणार आहे. ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली असून आज तिची चौकशी केली जाणार आहे.
एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली. त्यानंतर तिने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आणि आज तिची चौकशीही केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता एनसीबी तिची चौकशी करणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोणची उद्या चौकशी होणार आहे.
दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी मुंबईत दाखल झाली. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले. महत्त्वाचे म्हणजे दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग याने एनसीबीला पत्र लिहून चौकशीदरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. दीपिकाला डिप्रेशन आणि एन्झायटीचा त्रास असल्याचे कारण त्याने दिले आहे. या प्रकरणी एनसीबी त्याला परवानगी देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.