मराठी चित्रपट निर्माते विक्रम धाकतोडे पोलिसांच्या ताब्यात
मुंबई – प्रसिद्ध निर्माते व अभिनेता अमोल कागणे यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘टर्री’ या आगामी चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चित्रपट व्यवसायात सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून धाकतोडे यांनी कागणे यांना २९ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अमोल कागणे यांनी पोलिसांत धाव घेत मंगळवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धाकतोडे यांना पनवेल येथून ताब्यात घेतले.
‘चित्रपटाच्या ऍग्रीमेंटचा करार करतो आणि काही चित्रपट नावावरदेखील करतो, असे सांगत फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले. तसेच त्यांच्यात लेखी करार झाला असून फिर्यादी अमोल यांच्याकडून चित्रपट विकत घेण्यासाठी पैसे घेऊन तेच पैसे दुसऱ्या कामाकरिता वापर केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चित्रपटाच्या गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशाचा मोबदला मला न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार एप्रिल २०१९ ते २२ जून २०२० दरम्यान हिंजवडीत रोख रक्कम आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी विक्रम धाकतोडे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अमोल कागणे हे चित्रपट निर्माते असून ‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘वाजवू या बँड बाजा’, ‘परफ्यूम’, ‘बेफाम’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. तर आरोपी विक्रम धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतात.