पिठाच्या पिशवीमधून पैसे वाटणारी व्यक्ती आमिर खान नाही, आमिरने स्वत: केला खुलासा
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गरजू लोकांसाठी वाटण्यात आलेल्या पिठाच्या पिशवीमध्ये पैसे वाटण्यात आले होते… बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने लोकांच्या मदतीसाठी ही अनोखी पद्धत अवलंबली असल्याचा दावा केला गेला होता. मात्र आता आमिर खानने स्वत: याबाबत ट्विट करत आपण असली कोणतीही गोष्ट केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे…आमिर खानने ही गोष्ट सांगितल्यामुळे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य बाहेर आले आहे.
हा व्हिडिओ अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे. टिक टॉकवरही दावा केला होता की, आमिरनेच गव्हाच्या पिठाने भरलेल्या पिशव्यांमध्ये पैसे भरून ते गरिबांना वाटले. व्हिडिओनुसार 23 एप्रिल रोजी हा ट्रक दिल्लीतील गरीबांच्या वसाहतीत आला होता. काही ठिकाणी हा ट्रक मुंबई येथे आला असल्याचंही सांगितलं गेलं होतं. या उदार कामामागे आमिरचा हात असल्याचे बोलले गेले होते. कोविड-19 या आपत्ती काळात खरोखरच गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ही युक्ती केली असे सांगण्यात आले.
आता आमिरने यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केलं आहे. याबाबत त्याने ट्विटही केलं आहे…‘मित्रांनो, गव्हाच्या पिशव्यांमध्ये पैसे वाटणारी व्यक्ती मी नाही. ही एकतर पूर्णपणे बनावट कथा आहे, किंवा कोणीतरी असा रॉबिन हूड आहे जो स्वत:ची ओळख उघड करू इच्छित नाही! सुरक्षित राहा, सर्वांना प्रेम… आमीर’ असं ट्विट करत आमिरने या मदतीबाबत खुलासा केला आहे…