‘त्या’ चाहत्यासाठी वरुण ठरला रिअल हिरो, केली पाच लाखांची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/varun-.jpg)
‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवनचे जगभरामध्ये अनेक चाहते आहेत. त्यामुळे वरुणदेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असतो. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणच्या एका चाहत्याने त्याच्याकडे मदत मागितली होती. विशेष म्हणजे वरुणनेदेखील या चाहत्याला तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
काही दिवसांपूर्वी वरुणचा ‘कलंक’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु प्रेक्षकांना भूरळ घालण्यास हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. चित्रपटाच्या अपयशानंतर वरुणने त्याचा मोर्चा आगामी ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटाकडे वळविला आहे. त्यामुळेच सध्या वरुन डान्सशी संबंधित काही व्यक्तींना सोशल मीडियावर फॉलो करत आहे. त्यामुळे तो डन्स प्लस या रिअॅलिटी शोमधील कार्तिक राजा या स्पर्धकालाही फॉलो करत आहे. कार्तिकने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलांचा फोटो ठेवला होता. या मुलाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे वरुणने या मुलाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. वरुणच्या या मदतीनंतर सोशल मीडियावर सध्या #realherovarundhavan हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
कार्तिक राजाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इशान नामक एका मुलाचा फोटो ठेवला होता. इशानला डान्स करत असताना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमध्ये त्याच्या मानेला मार लागला. परिणामी, त्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. मात्र घरची आर्थिक परिस्थिती स्थिर नसल्यामुळे या मुलावर उपचार करणं अशक्य होतं. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहेत. इशानला मदत व्हावी यासाठी कार्तिकनेदेखील त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मदतीचे आवाहन केलं होतं. इशानचा फोटो पाहिल्यानंतर वरुणने कार्तिकजवळ या मुलाची चौकशी केली. त्यानंतर कार्तिकच्या मदतीने वरुणने इशानच्या उपचारासाठी पाच लाखांची मदत केली.
दरम्यान, इन्स्टाग्रामवर ‘टू द कल्चर’ या नावचं एक इन्स्टा हॅण्डल असून त्याचे ७० हजारच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. टू द कल्चर हा डान्सर, रॅपर यासारख्या कलाकारांसाठीचा मंच आहे. याद्वारे त्या-त्या क्षेत्राशी निगडीत काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं जातं. तर आपल्या क्षेत्राशीसंबंधित कोणती व्यक्ती अडचणीत असेल तर त्यांना मदतदेखील केली जाते.