‘तान्हाजी’च्या ट्रेलर लाँचला काजोल आली नाही, कारण…
येत्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर.’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटात शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा दाखवण्यात येणार. या चित्रपटात खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कपल अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांना पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे तर त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल साकारणार आहे.
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटातील कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान काजोल या कार्यक्रमाला अनुपस्थित होती. काजोल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून ट्रेलर लाँच वेळी का आली नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहीत शेट्टीने काजोलच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे.
‘जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तान्हाजी हे आपल्या मुलाचे लग्न सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलेले कार्य करण्यासाठी, लढाईसाठी निघून जातात. त्याच प्रमाणे काजोल तिचे कर्तव्यपार पाडत आहे. ती सध्या सिंगापूरमध्ये आहे. तिची मुलगी न्यासा सिंगापूरमध्ये शिक्षण घेते आहे आणि तिच्या शिक्षणासंबंधीत एका कार्यक्रमात पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. म्हणून काजोलला सिंगापूरला जावे लागले’ असे रोहित शेट्टीने सांगितले आहे.