ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Rishi-Kapoor-1.jpg)
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
67 वर्षीय ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हॉस्पिटलमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत अभिनेत्री-पत्नी नीतू सिंग आणि अभिनेते-बंधू रणधीर कपूर आहेत. “ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, त्यांना श्वासोच्छवास करण्यासही त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, परंतु ऋषी यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती रणधीर कपूर यांनी दिली.
गेल्या गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यांना त्यावेळीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु चार तासांतच त्यांना घरी सोडण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनच्या काळात त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विशेष पासही दिला होता. त्यांचे वैद्यकीय अहवालही बीएमसी आणि आरोग्य विभागाला पाठवण्यात आले होते.