जॉनच्या “सत्यमेव जयते’ विरोधात तक्रार
जॉन अब्राहमच्या “सत्यमेव जयते’चा पहिला ट्रेलर 28 जूनला रिलीज झाला. थोड्याच वेळात हा ट्रेलर व्हायरल देखील झाला. या ट्रेलरमधून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार हैदराबादेतील भाजपच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. या तक्रारीच्या आधारे “सत्यमेव जयते’च्या ट्रेलरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराचाच्या सरचिटणीसांनी ही तक्रार दाखल केली आहे. या ट्रेलरमध्ये मोहरमला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. खरे तर हा सिनेमा राजकारणातल्या भ्रष्टाचारावर केंद्रीत आहे. त्यामध्ये मोहरमच्या दृश्यांशिवायही दाखवता येऊ शकले असते. या सिनेमाच्या विषयाचा आणि मोहरमचा काहीही संबंध नाही. यामुळे एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असा आरोप करण्यात आला आहे. ट्रेलरमधून हा मोहरमचा सीन वगळण्याची मागणीही तक्रारदारांनी केली आहे.
अक्षय कुमारचा “गोल्ड’ आणि जॉनचा “सत्यमेव जयते’ एकाचवेळी म्हणजे 15 ऑगस्टच्या सुमारास रिलीज होणार आहेत. आता ही टक्कर टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ही टक्कर टाळण्याबाबत जॉनला विचारले असता, त्याचा निर्णय निर्मात्यांनी घ्यायचा असतो. कलाकारांनी नाही, असे उत्तर त्याने दिले.