जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई – गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौत जुहू पोलिसांच्या चौकशीला शुक्रवारी गैरहजर राहिली. मुंबईबाहेर असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असे कंगनाने पोलिसांना कळविले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतने अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक टिप्पणी केली होती. यावर आक्षेप घेऊन अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कंगनाची चौकशी करून अहवाल १ फे ब्रुवारीला सादर करण्याचे आदेश जुहू पोलिसांना दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला समन्स बजावले होते. मात्र मुंबईबाहेर असल्याने कंगना चौकशीला उपस्थित राहिली नाही. निवेदनाद्वारे पोलिसांना तिने याची माहिती दिली. दरम्यान आता पुढील तारखेला पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.