breaking-newsमनोरंजन

‘चांगल्या भूमिकांची आजही वानवा’

‘हिरोपंती’, ‘राबता’, ‘दिलवाले’ या तीन व्यावसायिक चित्रपटांनंतर क्रितीने आपला मोर्चा ‘बरेली की बर्फी’सारख्या चित्रपटांकडे वळवला. त्या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले. आता ती अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लुका छुपी’ चित्रपटात दिसणार आहे. शिवाय, ‘कलंक’ चित्रपटातील पाहुण्या कलाकाराची भूमिका त्यानंतर ‘पानिपत’, ‘अर्जुन पतियाला’, ‘हाऊ सफुल्ल ४’ हे क्रितीचे आगामी चित्रपट आहेत. त्यामुळे हे वर्ष क्रितीचेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बाहेरून येणाऱ्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणे हेच मोठे आव्हान असते. त्यातही एकदा ओळख मिळाल्यानंतर व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटी बाजूला सारून आपल्यातल्या कलाकाराला आव्हान देतील असे चित्रपट निवडायचे आणि चोखंदळ भूमिकांवरच कारकीर्द घडवायची हा निर्णय म्हणजे तसा धोकाच. हे आव्हान पेलण्यात यशस्वी ठरलेली सध्याची तरुण अभिनेत्री म्हणून क्रिती सननकडे पाहिलं जातं. मात्र अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिकांची वानवाच आहे, त्यामुळे काय निवडायचे? आणि काय करायच? हा निर्णय अधिक जाणीवपूर्वक घ्यावा लागतो, असं क्रिती म्हणते.

आजही भूमिकांची निवड करणं, एक कठीण काम आहे. विविध प्रकारच्या शैलीतील चित्रपट मी करत असून भूमिका निवडताना समतोल साधायचा आहे. कुठल्याही एक प्रकारच्या भूमिकेत अडकून पडायचे नाही, पण त्याचबरोबर आवडली तर ती भूमिका स्वीकारायची असेही ठरविले असल्याचे तिने सांगितले.

समकालीन अभिनेत्रींसमोरील आव्हानांविषयी विचारले असता ती म्हणाली, घरात मनोरंजन क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात येणं, इथं टिकाव धरणं, याला वेळ लागतो. तुम्हाला लागोपाठ दोन-तीन चित्रपट हिट द्यावे लागतात, तेव्हा तुमची ओळख बनते आणि त्या जोरावर काही चित्रपटात चांगल्या भूमिकांचे प्रस्ताव येतात.

बॉलीवूडमध्ये घराणेशाही आहे, अशी घराणेशाही प्रत्येक व्यवसायात असते. पहिल्या दोन-तीन संधी तुम्हाला पटकन मिळतात, पण त्यानंतर तुम्ही कितीही मोठय़ा घरातून आला असलात तरी तुम्हाला कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध करावंच लागतं. पण पुढे जाऊन एक वेळ अशी येते की तुम्ही कुठून आलात ही बाब नगण्य ठरते. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि मी आम्ही सगळेच इंडस्ट्रीच्या बाहेरचे होतो, पण त्यानंतर आम्ही स्वत:ला सिद्ध केलं, असं तिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘बरेली की बर्फी’ चित्रपटानंतर क्रिती फक्त मॉडेलिंगमधील ग्लॅमरस चेहरा न राहता, छोटय़ा शहरातील मुलगी वाटली. तेव्हा तिचं कौतुक झालं. याविषयी ती म्हणते, एका वेगळ्या भूमिकेतूनही प्रेक्षकांनी मला स्वीकारलं, त्यांना मी आवडले. त्यामुळे त्यानंतर गावाकडच्या किंवा छोटय़ा शहरातल्या मुलीच्या भूमिकेचीच विचारणा मला होऊ  लागली. मलाही आवडेल गावाकडची मुलगी साकारायला. पण मला इम्तियाज अली, अनुराग बासू, विशाल भारद्वाज, आनंद एल. राय यांच्याबरोबर काम करायचे आहे. यांच्याबरोबर काम करताना मला माझ्यातल्या अभिनेत्रीला आव्हान द्यायला आवडेल. जसं ‘रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ चित्रपटात रणबीर कपूरने जशा भूमिका साकारल्या तशा ताकदीच्या भूमिका मला अभिनेत्री म्हणून साकारायच्या आहेत. करीना माझी अतिशय आवडती अभिनेत्री असून ‘जब वुई मेट’ चित्रपटातील तिचे काम मला खूप आवडलं, असंही क्रिती म्हणाली.

चित्रपटामध्ये काम करताना एक स्त्री कलाकार म्हणून किती काळजी घ्यावी लागते, विनोदी किंवा सेक्सी प्रतिमा दाखवताना तिचं अनेकदा चुकीचं चित्रण केलं जातं, त्याविषयी ती म्हणते, मी स्वत: स्त्रीवादी आहे. स्त्रीच्या सन्मानाला धक्का लागेल, असं मी काहीही करणार नाही. मला योग्य वागणूक मिळत नसेल किंवा अशा बटबटीत व्यक्तिरेखा माझ्या वाटय़ाला आल्या तर मी ती भूमिका करणार नाही, असं तिने ठामपणं सांगितलं. अर्थात, सध्या चांगली वाटचाल सुरू असली तरी ज्या दिवशी लेखकांना आणि दिग्दर्शकांना ते कथेवर काम करत असताना त्यातील एखाद्या व्यक्तिरेखेसाठी माझा विचार प्राधान्याने केला जाईल तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असेल. त्या दिवसाची मी वाट पाहतेय. ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तसाच तो इतर दिग्दर्शकांनी ठेवला तर मीसुद्धा चांगल्या भूमिका करू शकते. या क्षेत्रात असुरक्षितता असून प्रचंड स्पर्धा आहे. पण तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहिलात आणि काळाप्रमाणे स्वत:ला बदलत गेलात तर तुम्ही नक्की टिकाव धरू शकता, असेही ती ठामपणे म्हणाली.

‘बरेली की बर्फी’ चित्रपटात उत्तर प्रदेशातील बरेलीतल्या ‘बिट्टी’साठी मला तिथली स्थानिक भाषा शिकावी लागली. पानिपत’ या आगामी चित्रपटात सदाशिवरावांची पत्नी ‘पार्वतीबाई’ ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे आता सध्या मराठी भाषा शिकतेय. पार्वतीबाई यांच्याविषयी फार कमी लिहिलं गेलं आहे. त्या कशा होत्या? याबद्दल कुठेच काही वाचायला मिळालं नाही. पण आशुतोष गोवारीकर यांनी जे संशोधन केलं, जी माहिती सांगितली त्यानुसार ही भूमिका आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय.

-क्रिती सनन

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button