काॅम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला पोलिस कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/images-1.jpg)
कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमोल काळेला एसआयटीने कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली.
अमोल काळेला मोठ्या पोलिस बंदोबस्तात हजर केल्यानंतर सुमारे पाऊणतास हा युक्तिवाद सुरु होता. विशेष सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. पंधरावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. राहुल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणी संशयित अमोल काळेचा ताबा कर्नाटक एसआयटीकडून एसआयटीने घेतला. त्याला आज (ता. १५) न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून पानसरे हत्येच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
लंकेश हत्येप्रकरणात काळेला घेतले होते ताब्यात
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित काळेला कर्नाटक एसआयटीने जून २०१८ मध्ये ताब्यात घेतले होते. ही चौकशी सुरू असतानाच नालासोपारा स्फोटकप्रकरणी काळे संशयित म्हणून पुढे आला. म्हणून सीबीआयने त्याला अटक केली होती. अमोलचे संदर्भ ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाशी असल्याचे तापासात पुढे येत आहेत. म्हणून कोल्हापूर पोलिसांनी याचा ताबा न्यायालयाकडे मागितला होता.