‘काबिल’ लवकरच चिनी प्रेक्षकांच्या भेटीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/kaabil-759.jpg)
गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये भारतीय चित्रपटांची चिनी बॉक्सऑफिसवर चलती पाहायला मिळते. त्यातलं एक उदाहरण म्हणजे ‘अंधाधून.’ या चित्रपटाने चिनी बॉक्स ऑफिसवर तब्बल १५० कोटींची कमाई केली आहे. आता हृतिक रोशन आणि यामी गौतमचा ‘काबिल’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे हृतिक रोशन आणि यामी गौतमचा ‘काबिल’ हा चित्रपट ५ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या चित्रपटाचा चिनी भाषेत पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
‘काबिल’ चित्रपट हा एक क्राइम थ्रीलर आहे. या चित्रपटाची निर्मीती राकेश रोशनने केली असून दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१७मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार असल्याने तो चिनी प्रेक्षकांना भावतो की नाही हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘काबिल’ या चित्रपटामध्ये सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या एका व्यक्तिच्या जीवनामध्ये काही कारणास्तव जेव्हा संकटांचे वादळ येते त्यावेळी डोक्यात सतत सूडबुद्धीचे वारे वाहत असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कोणकोणती वळणं येतात असे एकंदर कथानक या चित्रपटामध्ये साकारण्यात आले आहे. या चित्रपटात हृतिक आणि यामी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत.