आता सौरव गांगुलीवर बायोपिक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर चरित्रपट आले आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे सौरव गांगुलीची. एकता कपूर हिची बालाजी टेलिफिल्म्स गांगुलीच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकावर हा चरित्रपट आधारित असेल. सौरव गांगुली याने स्वत: हे पुस्तक लिहिले आहे. क्रिकेटपटू म्हणून गांगुलीला करावा लागलेला संघर्ष यातून पाहायला मिळेल.
सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. भारतीय संघात त्याने लढण्याची वृत्ती निर्माण केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक इतिहास घडवले. गांगुलीच्या चरित्रपटाच्या रूपाने हा इतिहास पडद्यावर जिवंत होणार आहे. ‘बालाजीशी माझी अंतिम चर्चा झालेली नाही. ती झाल्यावर सर्व काही कळेलच,’ असे गांगुलीने म्हटले आहे.