आणखीन पाच वर्षे सुहाना सिनेमात काम करणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/suhana-kha.jpg)
एकापाठोपाठ एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास आतूर झाले असताना शाहरुख खानची कन्या सुहाना मात्र आणखीन पाच वर्षे या लाईम लाईटपासून दूर राहणार आहे. स्वतः शाहरुख खाननेच हे ऐलान केले आहे. म्हणजे तिला पदार्पणासाठीही आणखी 5 वर्षे वाट बघायला लागणार. शाहरुखने ईदच्या निमित्ताने मिडीयाशी गप्पा मारताना ही माहिती दिली.
सुहाना अजून लहान आहे. तिला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. तिला अजून बॉलिवूडची हवा लागलेली नाही. तिच्या शिक्षणानंतर जर तिला वाटले तरच ती बॉलिवूडमध्ये करिअर करू शकते. त्यामुळे त्याबाबतही आताच काहीही सांगता येऊ शकणार नाही, असेही शाहरुख म्हणाला.
सुहाना बऱ्याचवेळा सिनेमाच्या पार्ट्यांमध्ये दिसत असते. तिच्याबद्दल खूप गॉसिपही व्हायला लागले आहे. त्यामुळेच शाहरुखने वेळेवर या चर्चेला पूर्णविराम देऊन टाकला आहे. एखाद्याबरोबर बाहेर जाणे म्हणजे ऍक्टर होण्याची तयारी करणे नव्हे. ती काही फिल्म स्टार नाही, तर फिल्म स्टारची कन्या आहे. माझ्याबरोबर येते तेंव्हा तिच्याबरोबर मीही फोटोसाठी पोझ देत असतो. जेंव्हा मिडीया समोर असतो, तेंव्हा आम्हाला हे सगळे मॅनेज करायला लागते. कारण मिडीयावाले आमचे दोस्तच असतात, पण लहान मुलांना हे समजत नाही, असे शाहरुखने अगदी निखळपणे हास्यविनोद करत सांगितले.
आपल्या मुलांनी किमान ग्रॅज्युएशन तरी व्यवस्थित पूर्ण करावे. सुहाना तर आताशी अकरावीत शिकते आहे. तिला ग्रॅज्युएट होण्यासाठी आणखी 5 वर्षे लागतील. तर आर्यनला 4 वर्षे लागतील. त्यामुळे या दोघांनाही बॉलिवूडमध्ये डेब्यु करायला अजून अवकाश आहे, असेही शाहरुखने स्पष्ट केले.
“आयपीएल’मध्ये पंजाबचा बॅट्समन शुभमन गिल आणि सुहाना यांच्यात गुटुर्गु सुरू असल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली होती. जरा चर्चेला सुरुवात झाली नाही, की लगेचच मिडीयामधून गॉसिप फॅक्टरी सुरू झाली आणि या दोघांचे अफेअर सुरू झाल्याचेही पीक पिकवण्यात येऊ लागले होते.