अॅक्शन चित्रपटातील कंगनाचा ‘धाकड’ लूक प्रदर्शित
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतने एक सरप्राइज दिला आहे. तिच्या आगामी अॅक्शन चित्रपटातील लूक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ‘धाकड’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये कंगना जबरदस्त अॅक्शन सीन करताना पाहायला मिळणार आहे.
आजूबाजूला लागलेली आग आणि कंगना हातात बंदूक घेऊन उभी असल्याचं या पोस्टरमध्ये पाहायला मिळतंय. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा पोस्टर शेअर केला आहे. यातील अॅक्शन सीन चित्रीत करण्यासाठी हॉलिवूडचे अॅक्शन दिग्दर्शक येणार असल्याचंही त्याने सांगितलं.
या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनिश घई करणार असून सोहेल मकलाई याची निर्मिती करणार आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यापूर्वी येत्या २६ जुलै रोजी कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कंगनासोबत राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे.