breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

भोसरीतील विलासरावांची नाराजी; शिरुरसाठी आढळरावांची डोकेदुखी!

भोसरीतून ‘लीड’साठी मनोमिलनाची अपरिहार्यता : लांडे-लांडगे जोडीची ताकद निर्णायक ठरणार 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

शिरुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवाजीराज आढळराव पाटील यांनी ‘शिवबंधन’ सोडून हातावर ‘घड्याळ’ बांधले. त्यासाठी मंचरला पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, या व्यासपीठावर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि हडपसरमधील राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे दिसले नाहीत. 

आढळराव पाटील यांनी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी ‘कॉम्प्रमाईझ’ केले. राजकीय विरोधक कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून घेतले. त्यामुळे खेड आणि आंबेगावमध्ये आढळराव यांना फायदा होईल, असा दावा केला जातो. 

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात भोसरी विधानसभा मतदार संघातून आढळरावांना तब्बल ३७ हजार मतांचे लीड मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत आढळरावांच्या विजयाचा मार्ग भोसरीतून सोपा होणार आहे. त्यासाठी भोसरीसह ग्रामीण भागात मोठा प्रभाव असलेले माजी आमदार विलास लांडे यांची साथही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. याचा पूर्ण अंदाज असल्यामुळेच आढळराव पाटील यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार विलास लांडे, आमदार महेश लांडगे यांचे फोटो न चुकता समाविष्ट केल्याचे पहायला मिळाले. पण, या कार्यक्रमाकडे विलास लांडे यांनी पाठ फिरवली. त्यात लांडे यांनी अजित पवार गटाकडून महायुतीसाठी लोकसभेची उमेदवारी मागीतली होती. विशेष म्हणजे, महायुतीमध्ये प्रसंगी महेश लांडगे यांना उमेदवारी द्या… अशी जाहीर भूमिकाही त्यांनी मांडली होती. मात्र, राष्ट्रवादीने त्यांच्या उमेदवारीला बगल दिली. लांडे आणि लांडगे हे मामा-भांजे आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा जास्त झाली.

शिरुरचा खासदार विलास लांडे- महेश लांडगे ठरवणार!

आमदार महेश लांडगे गतवेळीप्रमाणे महायुती धर्माचे पालन करीत आढळराव पाटील यांच्यासोबत ताकदीने प्रचार करतील. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांच्या नाराजीचा फटका आढळराव यांना बसण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये भोसरी मतदार संघात लांडे यांचा प्रभाव मोठा आहे. भोसरी मतदार संघात ५ लाख ३५ हजार ६६६ इतके मतदान आहे. यामध्ये लांडे आणि लांडगे यांचे वरचष्मा राहणार असून, आढळराव पाटील यांना या दोन्ही नेत्यांची जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. गतवेळी डॉ. कोल्हे यांचा लांडे यांनी प्रचार केला होता. लांडे आणि राष्ट्रवादीची एकत्रित ताकद सुमारे ७० हजार मतांची आहे. त्यामुळे लांडे आणि लांडगे यांची एकत्रित साथ शिरुरचा खासदार ठरवणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

… तर डॉ. कोल्हे यांच्यासमोर तगडे आव्हान!

२०१९ मध्ये महेश लांडगे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी आढळराव पाटील यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये भाजपा आणि लांडगे यांच्यावर केलेले आरोप राजकीय भूमिकेतून होते. आमच्यामध्ये आता राजकीय संघर्ष नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांच्याबाबतही आढळराव तीच भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, मतदार संघातील राजकीय विरोधक दिलीप मोहिते, दिलीप वळसे यांच्यासोबत आढळराव यांनी समझोता केला आहे. आता भोसरीत विलास लांडे यांच्याशी जुळवून घेतल्यास डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत तगडे आव्हान निर्माण करण्यात यश मिळेल, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button