breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराजकारण

ठरलं… ‘या’ दिवशी होणार शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार?

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्याचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत माहिती दिली असून पावसाळी अधिवेशनावरही भाष्य केलं आहे.
‘राष्ट्रपतिपदाची निवडणूक आज पार पडत आहे. ही निवडणूक झाल्यानंतर २० किंवा २१ जुलै रोजी खातेवाटप निश्चित होऊन मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल,’ असा गौप्यस्फोट भाजप नेत्याकडून करण्यात आला आहे. तसंच येत्या १० दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनही घेण्यात येईल. १० दिवसांचा अवधी मिळणार असल्याने नवे मंत्री आपलं खात समजून घेऊन अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, असंही भाजपच्या या नेत्याकडून सांगण्यात आलं आहे.

भाजपला आशा जास्त मंत्रिपदांची
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने ५० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र भाजपचे विधानसभेत १०६ आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद जरी शिंदे यांच्याकडे असले तरी मंत्रिमंडळात वजनदार खाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती देणाऱ्या भाजपच्या सदर नेत्याने म्हटलं आहे की, ‘मंत्रिमंडळात पक्षाला चांगलाच समतोल साधावा लागणार आहे. कारण २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला कोणतेही मोठे निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाला काम करण्यासाठी पुढील १८ महिन्यांचाच कालावधी असणार आहे.’

शपथविधी सोहळ्याच्या स्वरुपावरून शिंदे गटात मतमतांतरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीबाबत मतमतांतरे असल्याचे समजते. राज्यातील पावसाची स्थिती लक्षात घेत शपथविधी सोहळा भव्यदिव्य नसावा, असं काही आमदारांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे विधानभवन परिसरात हा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी काही शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीही अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button