breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसंपादकीय विभाग

सुसंस्कृत पुणे केवळ नावालाच राहिलंय!

दारूच्या नशेत अति भरधाव वेगात गाडी चालवून बड्या बापाच्या कार्ट्याने दोन निष्पाप जीव घेतले. ती मुलगी अक्षरशः १५ फूट उंच उडून आपटली, तिची हाडं मोडली. दोघेही जागेवर मेले. हे तर वाईटच आहे पण खरी शोकांतिका पुढे आहे. पब्लिक ने चोप दिल्यावर आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यावर काय काय घडलं ते सगळीकडे सोशल मीडिया वर येतच आहे. लोकांचा आक्रोश इतका होता की शेवटी उपमुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई चे आदेश द्यावे लागले. पोलीस ठाण्यात पराक्रमी मुलाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न झाले कारण खेळ पैशाचा होता.सगळ्यात मज्जा म्हणजे एवढ्या भयानक गुन्ह्यात कोर्टानी मुलाला त्वरित जामीन दिलाय कारण कलमच तसं लावलं होतं. आणि शिक्षा काय तर निबंध लिहायचाय अपघातांवर आणि चौकात उभं राहून वाहतूक नियमान करायचंय. धन्य तो कायदा आणि धन्य ते न्यायाधीश. खरंच आपला समाज आता इतका संवेदना हीन झालाय का? की आपल्याला पैशापुढं काहीच दिसत नाहीये. सर्व काही मॅनेज करायचा जोरदार प्रयत्न झाला हे शेम्बडे पोरगं पण सांगेल. केवळ न केवळ सामान्य नागरिकांनी आवाज उठवला म्हणून सरकारला आणि न्यूज चॅनेल ला दखल घ्यावी लागली त्यामुळे आवाज उठवणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. फक्त ट्रिप न कार घेतल्याचे फोटो शेअर करण्यात धन्यता मांडण्यापेक्षा किंवा अगदीच निष्क्रिय राहून ‘मला काय करायचंय’अशी भूमिका घेण्यापेक्षा अश्या प्रसंगी तरी व्यक्त व्हा आपापल्या परीने. लक्षात ठेवा ही वेळ आपल्याही मुलांवर येऊ शकते.

मागील दहा वर्षात पुण्याचा वेगाने विकास झालेला आहे. आणि दरवर्षी काही लाख मुले शिक्षणाकरता पुण्यात येतात.मित्र-मैत्रिणींसोबत एकटे राहत असल्याने आणि कसलाही अंकुश नसल्याने पार्ट्या पब यांची सवय या पिढीला लागलेली आहे. अर्थात यात पुण्यातली धनाढ्य पैसे कमावण्यात व्यस्त आणि सर्व सुख सोई देऊन मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वैराचारला आमंत्रण देणाऱ्या पालकांची मुलेही आहेतच.अत्यंत भयंकर आणि किळसवाणे प्रकार रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपल्या पर्यंत नाही पोहचत सगळे. नशेत धुंद तरुण तरुणी अपरात्री उच्चभ्रू भागात धिंगाणा करताना सहज दिसतात. एके काळी सुसंस्कृत म्हणून असलेली पुण्याची ओळख केव्हाच पुसली गेली आहे.रोज कोयत्याने मारामारी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या गँग शहरात आहेत. करोडो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पुण्यातच सापडलाय. सुमारे ४०० पब मध्ये सर्व नियम धुडकावून मध्यरात्रीपर्यंत दारू आणि अमली पदार्थ घेऊन तरुणाई कानठळ्या बसवणाऱ्या संगीतात धुंद असते. सर्व मेट्रो शहरात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे.सर्वच पालकांसाठी आणि मुलांसाठी ही धोक्याची घंटा आहे.आपला पाल्य काय करतो याकडे पालकांचे लक्ष अतिअवश्यक आहे.

पोलीस आणि प्रशासनाची भूमिका तर सगळ्यात महत्वाची आहे.आर्थिक हितसंबंध जपत बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन काही अधिकाऱ्यांकडून मिळतंय हे सत्य आहे.हप्ता संस्कृती वर अंकुश घातल्या शिवाय अश्या गोष्टी बंद होणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांमध्ये माणुसकी आणि संवेदना जागृत असणं आवश्यक आहे. दोन निष्पाप जीवांच्या मृत्यू वर सुद्धा आर्थिक हिताचा विचार करून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न करणं खरंच माणुसकी मेल्याचं लक्षण आहे.

अजूनही वेळ गेलेली नाहीये. पालकांनी थोडंसं जागरूक होणं आणि पोलीस आणि प्रशासनाने प्रमाणिकपणे कर्तव्य बजावणे ही काळाची गरज आहे नाहीतर येणारा भविष्यकाळ पुढील पिढीला संकटात टाकणार आहे हे नक्की.

– सुनील शाळगावकर, ज्येष्ठ संपादक, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button