‘‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे’’ । भोसरीतील काठावर असलेल्यांना खासदार डॉ. कोल्हेंचा गर्भीत इशारा!
विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत उमेदवारालाच संधी देणार : महायुतीतून महाविकास आघाडीत प्रवेश करणाऱ्यांची दारे बंद
!["Crows are gone, warriors remain". MP Dr. Kolhe to those on edge in Bhosari Implicit warning !](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Amol-Kolhe-1-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतनिधी
लोकसभा निवडणुकीत कुणी- कसे- कधी आणि कुठे काय-काय केले याचा सर्व रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्यामुळे कुणीही कितीही काव- काव केली, तरी विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत उमेदवाराला संधी मिळेल. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशी आमची भूमिका आहे. काठावर बसलेल्या कावळ्यांना संधी नाही. त्यामुळे हा मतदार संघ कुणाला सोडणार? काय करणार? यापेक्षा भोसरीचा आमदार महाविकास आघाडीचा होईल, असा दावा शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
शिरुर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मोशी येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा निवडणूक प्रमुख धनंजय आल्हाट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणुकीतील विजयाबाबत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दिल्लीला दाखवून दिले, की आम्ही दिल्लीसमोर झुकणारे नाही, तर दिल्लीश्वरांसमोर छाती काढून उभा राहणारे आहोत, असा घणाघातही डॉ. कोल्हे यांनी केला.
आमदार महेश लांडगे यांना टोला…
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे तगडे नेते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. त्यामुळे आता काय होणार? असे वारंवार वाटत असे. ५ ते १० हजार कमी-अधिक फरकाने निवडणुकीचा निकाल लागेल, असे वाटत असे. महायुतीच्या नेत्यांकडून १ लाखांचे लीड, ५० हजारांचे लीड देणार अशा वल्गना केल्या होत्या. ‘हवा’ निर्माण केली होती. मात्र, मतदारांनी आपल्याला साथ दिली, अशा शब्दांत खासदार कोल्हे यांना आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला.
उबाळे की आल्हाट उत्सुकता शिगेला… लांडेंची अस्वस्थता..!
भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला. तसेच, ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे’ असा दावा करीत, भोसरीचा आमदार महाविकास आघाडीचा होईल, असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे महायुतीत तिकीट न मिळाल्यास महाविकास आघाडीचा पर्याय हाती घेण्याची शक्यता असलेले माजी आमदार विलास लांडे यांना ठाकरे गट किंवा शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. परिणामी, लांडे यांची अस्वस्थता वाढली आहे. तसेच, भोसरीतून शिवसेना ठाकरे गटाकडून शहर संघटीका सुलभा उबाळे आणि भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख धनंजय आल्हाट दोघे इच्छुक आहेत. या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.